एका कम्युनिस्ट नेत्याचे स्वप्न. ते पूर्ण झाले तर निवडणुकीत त्यांना फायदा होईल ही काँग्रेसच्याहजार नेत्यांना भीती. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांनी खोडा घातला. हीच भीती भारतीय जनता पक्षालाही होती. पण राजकारण एका बाजूला आणि जनतेप्रति संवेदनशीलता महत्त्वाची असे मानणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मदत केली. सोलापूर येथे रे नगर नावाने श्रमिकांची कॉलनी उभी राहिली आहे.
सोलापूरचे माजी आमदार आडम मास्तर श्रमिकांसाठी घरे बांधण्याच्या ध्येयाने झपाटले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मदतीची अपेक्षा करत होते. आडम मास्तर यांना या योजनेचे श्रेय मिळाले तर निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना फटका बसण्याची भिती होती. आडम मास्तर हे सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर प्रणिती शिंदे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येईल म्हणून काँग्रेसच्या सरकारने रे नगरचा प्रकल्प दबाव टाकून रखडवत ठेवला.
2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पुन्हा एकदा आडम मास्तर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फडणवीस यांच्यापुढे रे नगर प्रकल्पाची माहिती दिली. रे नगर प्रकल्प कसा रखडला होता. याची माहिती फडणवीस यांना देखील होती. फडणवीस यांनी आडम मास्तर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शब्द दिला की आपण ही योजना नव्याने मार्गी लावू. त्यासाठी मी याची फाईल पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे पाठवतो, असे आश्वासन दिले. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये व्यंकय्या नायडू हे गृहनिर्माण मंत्री होते. फडणवीस यांच्या उपस्थितीत आडम मास्तर यांनी नायडू यांच्या समोर रे नगर या 30000 घरांची योजना समजावून सांगितली.फडणवीस यांच्या प्रस्तावर केंद्राकडून सकारात्मक होकार आला. 26 जुलै 2017 मध्ये केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि हा प्रकल्प पुढे मार्गी लागला. या योजनेतून केंद्र सरकारचे 1.5 लाख, राज्याचे 1 लाख आणि लाभार्थ्यांचे 50000 रोख व 2 लाखांचे कर्ज अशी ही योजना मंजूर झाली. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती. यावरून आडम मास्तर म्हणाले, की मी माकप आणि फडणवीस हे भाजपचे आहेत, आमची विचारसरणी विभिन्न टोकाची आहे. मात्र दोघांची कामगारांच्या प्रश्नावर एक वाक्यता होती.त्यामुळे फडणवीसांची आम्हाला मोलाची साथ मिळाली.
यूपीमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये रे नगर प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प 30000 घरांचा आणि असंघटीत कामगारांसाठी राबवला जाणार होता. देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प होता. प्रदर्शनात मोदी यांनी रे नगर च्या स्टॉलला भेट दिली. त्यांनी लगेच या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला जाण्याचे निश्चित केले आणि 9 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली. त्याच वेळी मोदींनी जाहीर केले की, माझ्या हस्ते पायाभरणी झाली आहे, या घरांच्या चाव्या देण्यासाठीदेखील मीच येईन आणि आता पंतप्रधान मोदी तब्बल 5 वर्षानंतर त्यांचे आश्वासन पू्र्ण करण्याठी 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूरमध्ये येत आहेत.
या प्रकल्पातील घरासांठी कामगारांना 2 लाखांचे कर्ज आवश्यक होते. मात्र बहुतांश बँकांकडून कर्ज देण्यास नकार दिला जात होता. त्यातच कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. आर्थिक तंगी सुरु झाली. यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून या प्रकल्पास कर्ज प्रकरणे मंजुर व्हावीत म्हणून राष्ट्रीय बँकाना सहभागी करून घेतले. त्यामुळे कामगारांच्या कर्ज मंजुरीचाही मार्ग मोकळा झाला. आज या कामगारांचे आणि नरसैया आडम मास्तरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. एका कम्युनिस्ट नेत्याच्या स्वप्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले आहे.
विशेष म्हणजे कट्टर कम्युनिस्ट असलेल्या आडम मास्तरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची कृतज्ञताही व्यक्त केली. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारी महिन्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्ताने सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी नरसय्या आडम यांनी मोदी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून भाषण करीत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हाती घेतलेल्या ३० हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे कारण देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना निलंबित केले. पक्षाची तत्त्वे मला माहीत आहेत. त्याला मुरड घालून कष्टकऱ्यांसाठी निर्णय घेतला होता, असे आडम मास्तर यांनी ठणकावून सांगितले होते.
