श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 4 जानेवारी 2024 रोजी केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचा 22 जानेवारीचा लोकार्पणाचा दिवस हा दिवाळी म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. या दिवशी देशभरात दीपावली साजरी करण्यात यावी, घरोघरी दिवे लावण्यात यावेत, दीपोत्सव साजरा करण्यात यावा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. प्रभू श्रीराम लंका जिंकून 14 वर्षांचा वनवास करुन अयोध्येत परत आले होते तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवाळी साजरी केली होती. अगदी तशाचप्रकारचं सेलिब्रेशन करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना, 22 जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अधिकाधिक लोकांना पाहता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. आता या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी 51 इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे.

अयोध्येमध्ये दुपारी साडे बारा वाजता मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी संबोधन करणार आहेत. सोहळ्याला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी आता पासूनच भव्य तयारी केली जात आहे. या दिवशी देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचे वादन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशातील वातावरण धार्मिक झाले आहे.अभिषेक सोहळ्यापूर्वी मंगळवारपासून अयोध्येमध्ये अनेक विधी सुरू झाल्या आहेत. हे कार्यक्रम 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे देशातील वातावरण सध्या राममय झाले आहे. तसेच, शिंदे सरकारच्या या निर्णयाने राज्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.