लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवालाही घर बांधून देऊ शकणार नाही – उमपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला सुद्धा सर्वांना घर देणं शक्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील कार्यक्रमात त्यांनी हगे मिश्किल वक्तव्य केलं.अजित पवार म्हणाले, बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा. तेवढं करा, कारण मी काही वर्षापूर्वी खासदार झालो. तेव्हा लोकसंख्या काय होती अन् आता ३३ वर्षांनी किती झालं. मग ब्रह्मदेव जरी आला तर सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही.

पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल. मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नका. तर ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. लॉटरी सिस्टीम पारदर्शक आहे. या मध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही.

पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही पारदर्शक आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात,जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे पीए असतील त्यांच्यावर ही विश्वास ठेवू नका. नाहीतर दस का बीसचे प्रकार घडतात. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झाल, असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे.