पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामराज्याची संकल्पना समोर ठेवूनच काम करत आहेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवाद मुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाही मुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामराज्याची संकल्पना समोर ठेवूनच काम करत आहेत असंही ते म्हणाले,तसंच आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली आहे. ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. प्रभू रामाचं अस्तित्व नाकारणारे लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कसे काय जातील? असा सवाल त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ,आज या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्जन शक्ती आहेत, दहशतवाद माजवत आहेत त्यांचा नायनाट करत आहे. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकही केले जातात आणि ३७० कलम हटवून दुर्जन शक्तींना सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करु देणार नाही. रामराज्याची संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करुन दाखवलं. कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता गरीब कल्याणाचं काम केलं. राजीव गांधी म्हणायचे मी एक रुपया दिल्लीहून पाठवला की १५ पैसेच गरीबाला मिळतात बाकीचे पैसे व्यवस्था खाऊन टाकते. मात्र मोदींनी अशी व्यवस्था उभी केली जी गरीबाच्या खात्यात संपूर्ण एक रुपया जाईल.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवर देखील भाष्य केले,ते म्हणले असे नाही की कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही आहे. ते एखाद्याचा मुलगा मुलगी आहे नातू आहे सून आहे किंवा एवढ्याच क्वालिफिकेशन वर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये,त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे. असे वाटते की प्रभू श्रीरामांनी सांगितले राज्य सर्वसामान्यांचे असले पाहिजे हे राज्य हे केवळ मूठभर लोकांचे असू नये. आज आपण पाहतोय मोदीजींनी देखील सामान्य माणसाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अधिकार दिला.

मोदींच्या राज्यात सरकारने दृढतेने सांगितलं की रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या आहेत तीच रामजन्मभूमी आहे. आम्हाला तिथेच मंदिर सापडलं आहे, आम्हाला तिथेच ६४ खांब मिळाले. त्याच ठिकाणी मूर्तीही सापडल्या आहेत. त्याच ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर आम्ही बनवणार हे सांगणारे मोदीजी होते आणि राम मंदिर समिती होती. त्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहोत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने धावणारी अर्थव्यवस्था आहे. आता पाचव्या क्रमांकावर आपण आलो आहोत कारण आपली ताकद आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून मोदींनी आपल्याला आठवण करून दिली. आज परिणाम जगातल्या सर्वात जास्त डिजिटल ट्रांजेक्शन मध्ये भारताचा चीनला देखील मागे टाकले आहे. भारत हा पहिला देश झाला की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी चंद्रयान उतरवले. जे अमेरिकेलाही जमलं नाही, जे जपानलाही जमलं नाही हे भारताने करून दाखवले.