ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भूमीत आता जटायू पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. विशेष म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायू पक्षाच्या ताडोबातील अधिवासामुळे निसर्गाची श्रृंखला पुर्नस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते कोळसा वन परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बोटेझरी जटायू संवर्धन राज्यस्तरीय प्रकल्पाचे उद्घाटन करताना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, उपसंचालक नंदकिशोर काळे, सरपंच माधुरी वेलादे आदी उपस्थित होते.
रामायणामध्ये जटायू पक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथे राज्यातील जटायू संवर्धनाचा महत्त्वाचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पांढरी पाठ असणारे 10 जटायू पक्षी देण्यात आले असून यापुढेही ताडोबात टप्प्याटप्प्याने जटायू येणार आहेत.
प्राणवायु देणारे वन अतिशय महत्त्वाचे आहे. आज अर्थशास्त्रापेक्षा पर्यावरणशास्त्र आणि वनशास्त्राला महत्त्व आले आहे. चंद्रपूरच्या जनतेने वनांवर मनापासून प्रेम केले आहे. आयुष्याचा पहिला श्वास वनांसोबत आणि शेवटचा प्रवासही लाकडासोबतच होतो. त्यामुळे पर्यावरण राहिले तरच मनुष्यसृष्टी राहील आणि जटायू हा पर्यावरणाचा स्वच्छतादूत आहे, त्यामुळेच जटायू संवर्धनाचा संकल्प केला आहे. आज 10 जटायू आहे, आता त्याची संख्या 20 आणि पुढे 40 करण्यासाठी ज्यांच्या नावातच ‘राम’ आहे, अशा डॉ. रामगावकर यांच्यावर जटायू संवर्धनाची जास्त जबाबदारी आहे, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वनभूषण पुरस्कार : वनांसोबत आयुष्याचे एक नाते असते. वनांपासून वनांसाठी मनापासून काम करणाऱ्यांना आता महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. ताडोबा उत्सवामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
