उत्तर भारतात थंडीचा कडाका, तर राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता

देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुक्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतीय राज्य पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

राज्यात विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये अवकाळीच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच सध्या चक्राकार वारेही सक्रिय असल्यामुळं राज्यात शीतलहरींचा प्रभावही दिसून येणार आहे. मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरपर्यंत तापमानात घट नोंदवली जाईल. पुण्यातील डोंगराळ भागांमध्ये वातावरण ढगाळ राहील, तर साताऱ्याच्या डोंगररांगांवरही ढगांचं सावट काही काळासाठी पावसाबाबतच्या चिंतेत भर टाकताना दिसेल.

महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली असून त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत आहे. हवामान खात्यानेही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढत आहे.राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भात आजपासून किरकोळ पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्याच्या घडीला कोकणाचा उत्तर भाग आणि नजीकच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्यामुळं कर्नाटकापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा सक्रीय आहे. ज्यामुळं अवकाळीची हजेरी विदर्भात पाहायला मिळू शकते. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका वाढताना दिसेल, तर निच्चांकी तापमान 8 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीचा तडाखा फक्त महाराष्ट्राच्या विदर्भालाच बसणार नसून, आंध्रचा किनारी भाग, केरळ, लक्षद्वीप आणि सिक्कीममध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिसा आणि छत्तीसगढलाही अवकाळीचा तडाखा बसू शकतो असं सांगण्यात येत आहे.