आयएसआयएस या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेतील मृत पावलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांना आर्थिक रसद पुरविणार्या संशयित तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) नाशिक येथून अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज (वय ३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी, तिडके कॉलनी, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हुजेफ शेख याने श्रीलंका, दुबई,शारजा अशा अनेक देशांमध्ये प्रवास केल्याचे माहिती समोर आली आहे.
हुजेफ हा अभियंता असून त्याच्या काही कंपन्यादेखील आहेत. सिरीयाच्या सीमारेषेजवळ असणार्या एका महिलेच्या सांगण्यावरुन काही व्यक्तीच्या खात्यात शेख रक्कम पाठवत होता, असा दावा एटीएसने केला आहे.नाशिक येथील घरझडतीत एटीएसने मोबाईल, सीमकार्ड, लॅपटॉप, पेनड्राइव्ह अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहेत. आरोपीच्या अन्य सहकार्यांचा शोध घेण्यासाठी एटीएसची पथके इतर राज्यात पाठविण्यात आल्याची माहिती एटीएस अधिकार्यांनी दिली.
दहशतवाद विरोधी पथकाने तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथे ही कारवाई केली. घराच्या झडतीत अनेक भ्रमणध्वनी व सिमकार्ड, लॅपटॉप, पेनड्राईव्हसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे यंत्रणेच्या हाती लागली. हुजेफ अब्दुल अजीज हा अभियंता आहे. अनेक खासगी कंपन्यांमध्ये तो भागीदार असल्याचे सांगितले जाते. भारत सरकारने बंदी घातलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तो नियमितपणे संपर्कात होता, असे एटीएसच्या तपासात उघड झाले. त्याने उपरोक्त दहशतवादी संघटनेला पैसे पुरवले. सीरियातील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेमार्फत वित्त पुरवठा करत संशयिताने दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातल्या 41 ठिकाणी एनआयएचे छापे
मागील महिन्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आयसिस या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या आरोपांवरून ठाणे जिल्ह्यासह देशभरात कारवाई केली. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४१ ठिकाणी छापे मारण्यात आले होते.पडघ्यात ३१ ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर १४ जणांना ताब्यात घेतले होते. आरोपींकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आले आहे.
