अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशवासीयांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे एक कोटी घरांच्या छतावर रुफटॉप सोलर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये देशवासियांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे. पीएम मोदींनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेला भगवान श्री राम यांच्याशी जोडले आणि काल म्हणजेच सोमवारीच या योजनेअंतर्गत देशवासीयांना लाभ देण्याची घोषणा केली.
रूप-टॉप सोलर योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत देशातील गरीब जनतेला विजेच्या वाढत्या किमतींपासून मुक्त करण्यात मदत होणार आहे. सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील कुटुंबांच्या घरांच्या छतावर रूप टॉप सोलर म्हणजे सौर यंत्रणा बसवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत भारतात सौर ऊर्जा सुमारे 73.31 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, डिसेंबर 2023 रूफटॉप सोलर क्षमता सुमारे 11.08 गिगावॅट आहे. केंद्राकडे सध्या राष्ट्रीय रूफटॉप योजना सौर रूफटॉप प्रकल्पाच्या भांडवली खर्चाच्या एकूण 40 टक्के आर्थिक सहाय्य देते.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 चा लाभ देशातील फक्त त्या लोकांनाच मिळणार आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. सोप्या भाषेत या योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांनाच मिळणार आहे.
ही योजना नेमकी कधीपासून सुरू होणार आहे याबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच यासाठीचा रोडमॅप जारी करण्यात येईल. सध्या सोलर पॅनलबाबत केंद्र सरकारची आणखी एक योजना सुरू आहे, ज्यामध्ये सरकार यासाठी सब्सिडी देत आहे. तुम्ही किती क्षमतेचे पॅनल्स आणि बॅटरी लावत आहात यावर सोलर पॅनल सेटअपचा खर्च अवलंबून असतो. एक किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 50 हजार ते एक लाख रुपये एवढा खर्च येतो. तर 5 किलोवॅट क्षमतेच्या सेटअपसाठी 2.25 ते 3.25 लाख रुपये खर्च येतो. सध्या केंद्र सरकार ‘नॅशनल रुफटॉप स्कीम’ अंतर्गत सोलर पॅनलवर 40 टक्के सब्सिडी देत आहे.
ग्राहक http://www.solarrooftop.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती अक्षय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी संसदेत दिली. तसेच सौर प्रणाली स्थापन झाल्यानंतर या योजनेचे अनुदान थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा केले जाते, असेही ते म्हणाले. याबरोबरच या सौर प्रणालीद्वारे निर्मित झालेली अतिरिक्त ऊर्जा राज्य विद्युत महामंडळालाही विकली जाऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
