हुडहुडी कायम! राज्यात अजून थंडीचा मुक्काम राहणार

महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. मुंबईमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये जास्त थंडी जाणवतेय. राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान १० डिग्रीपेक्षा खाली गेलंय. शुक्रवारी जळगावात सर्वात कमी तापमान ८.८ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलंय. निफाडसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे. महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. प्रदेशातील अनेक भागांमध्ये दाट धुकं पडलं आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या अधिक भागांमध्ये किमान तापमान १० डिग्री सेल्सियसच्या जवळपास होतं. हवामान विभागाने अंदाज वर्तवला की, राज्यात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहू शकते.

डोंगराळ भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. सकाळच्या तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. धुकेही कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यासोबतच ट्रेन आणि विमान उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतांश भागात मध्यम ते दाट धुके दिसले.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक थंडी आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात १७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईचे कमाल तापमान अनुक्रमे ३०.८ अंश सेल्सिअस आणि ३२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीच्चांकी तापमान मंगळवारी नोंदवले गेले. शुक्रवारपर्यंत किमान तापमान १६ ते २० अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेशातील उंच भागात हवामान बदललं आहे. रोहतांग पास, पांगी आणि राज्यातील इतर उंच पर्वतीय भागात हिमवृष्टी झाली आहे. पावसाच्या आणि बर्फवृष्टीच्या दरम्यान तापमानात आणखी घट झाल्याचं दिसून येत आहे. बर्फवृष्टीनंतर पांगी भागात थंडीची लाट वाढली आहे. राजधानी शिमलामध्ये शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. मध्येच हलका सूर्यप्रकाश पाहायला मिळाला.