विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आता एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेताना ज्या दहाव्या परिशिष्ठाचा आधार घेतला आहे, त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये ही घोषणा केली.
गेल्या सहा महिन्यांपासून राहुल नार्वेकरांसमोर शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चालू होती. अखेर तीन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर १२ जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांनी शिवसेना प्रकरणी निकाल दिला. आता ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यावर सुनावणी चालू आहे.दरम्यान, या सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकरांनी सातत्याने घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा, अर्थात ज्यात पक्षांतरबंदी कायदा व त्यासंदर्भातल्या तरतुदींचा उल्लेख आहे, त्याचा संदर्भ घेतला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्येही वारंवार पक्षांतरबंदी कायद्याचा उल्लेख आला. त्यामुळे याच कायद्याची चिकित्सा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल नार्वेकरांवर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पक्षपातीपणे निकाल दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अपात्रता प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असताना ही सुनावणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरूनही विरोधक राहुल नार्वेकरांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतरबंदी कायद्याची चिकित्सा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे विरोधकांची यावर नेमकी काय भूमिका असेल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
१९६७ मध्ये हरियाणाचे आमदार गया लाल यांनी एका दिवसात तीन पक्ष बदलले होते. त्यानंतर आया राम गया राम ही म्हण रुढ झाली. पद आणि सत्तेच्या मोहात पक्ष बदलण्याचा कृतीला थांबवण्यासाठी राजीव गांधी सरकारने १९८५ मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणला. मर्जीप्रमाणे पक्ष बदलण्याच्या वृत्तीला यामुळे अटकाव झाला, तरी यामध्ये देखील अनेक पळवाटा काढण्यात आल्या आहेत
