वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे. जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की,व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत. हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती. सोमनाथ व्यास यांचे कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होते. 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली.
17 जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले. काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे.हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी ज्ञानवापी प्रकरणात हा पहिला विजय असल्याचं म्हटलं आहे. वकील विष्णू जैन यांनी आम्ही यापुढे देखील लढा सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं. 1986 च्या निकालाप्रमाण हा निकाल असल्याचं विष्णू जैन म्हटले आहेत.
दरम्यान, मुस्लीम पक्षकारांकडून या निर्णयाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशिदीचं गेल्या वर्षी भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आजच्या निर्णयामुळं ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्यासाठी जाण्यासाठी हिंदू पक्षकारांना परवानगी मिळाली आहे. ज्ञानवापी मशिदीत दोन तळघरं असून त्यातील दुसऱ्या तळघराचा ताबा मुस्लीम पक्षकारांकडे आहे. आजचा निर्णय हिंदू पक्षकारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी सुरु आहे.
