भावजयातील वादात गेले मुख्यमंत्री पद

देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना घराणेशाहीचा शाप आहे. महाराष्ट्रात पवार कुटुंबात हे घडले. उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यात वाद सुरूच असतात. कुटुंबातील कलहांमुळे त्याचे राजकीय पडसादही उमतल्याचेही आपण पाहिले आहे.

सध्या झारखंड हे राज्य राजकीय चर्चेत आहे. रांचीच्या कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटकही केली. आता चंपई सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील. आतापर्यंत हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, बुधवारी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली तेव्हा चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्याचे कारण भावजयांमधील वाद आहेत. सोरेन कुटुंब हे झारखंडमधील सर्वात मोठे राजकीय कुटुंब मानले जाते.

हेमंत सोरेनच्या आधी त्यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन हे झारखंडचे तीनदा मुख्यमंत्री होते. त्यामुळे याच कुटुंबातील कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी शक्यता होती. कल्पना सोरेन मंगळवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही उपस्थित होत्या. राजकीय कुटुंबातून आलेल्या कल्पना सोरेन या राजकारणापासून दूर असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत होती. एवढेच नाही तर सीता सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आले होते. सीता सोरेन या हेमंत सोरेन यांचा मोठा भाऊ दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत. 2009 मध्ये दुर्गा सोरेन यांचे निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करून कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले असते, तर कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकला असता, असे मानले जात आहे.

कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले तर कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. मंगळवारी आमदारांची बैठक पार पडली, तेव्हा अनेक आमदार उपस्थित राहिले नाहीत. युती सरकारमध्ये एकूण 49 आमदार आहेत, परंतु त्यापैकी केवळ 35 आमदार बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला न आलेले आमदार कल्पना सोरेन यांच्याऐवजी सीता सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही काळापूर्वी कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सीता सोरेन म्हणाल्या होत्या की, ‘मी सोरेन कुटुंबाची मोठी सून आहे. माझ्या पतीने झारखंडच्या निर्मितीसाठी बराच काळ प्रचार केला होता. मी हेमंत सोरेन यांना माझा उत्तराधिकारी मानलं, इतर कोणालाही नाही.’

अशा स्थितीत कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्याने पक्षात फूट पडण्याचा धोकाही वाढला होता. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दावा केला की, 29 पैकी 18 आमदार हे कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यास तयार नव्हते.’ कल्पना सोरेन यांच्याऐवजी हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी 18 आमदार करत असल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला होता.मात्र या भावजयांच्या वादात सोरेन कुटुंबाकडून मुख्यमंत्रीपद निसटले. देशातील प्रादेशिक पक्षांमधील घराणेशाही आणि कुटुंबातील कलहही या निमित्ताने पुढे आला.