ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपण त्यांच्याशी बोललो असून, अभिनंदन केलं असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यात मोलाची भूमिका निभावली होती. प्राणप्रतिष्ठानेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत होते. त्यातच आता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन. देशाच्या विकासात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान बहुमोल आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून त्यांनी देशसेवा केली. देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
अडवाणीजींची सार्वजनिक जीवनातील अनेक दशके चाललेली सेवा पारदर्शकता आणि सचोटीच्या अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केली गेली आहे. त्यांनी राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय दर्जा निर्माण केला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानेन,असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. 1980 साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. 1998 साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर 2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.
काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
