गोळीबार प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून होणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्याविषयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

गोळीबार प्रकरणाची तपास गुन्हे शाखा करणार असून आता एसीपी रॅंकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, कल्याणची घटना गंभीर आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता. त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाला. याचाही तपशील बाहेर काढावा लागेल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजींना आदेश दिले आहेत. यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

या प्रकरणात भाजप आमदारा गणपत गायकवाड सह, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाडांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आज या सर्वांना कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकापाठोपाठ एक अशा ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील यावेळी गोळी लागली. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाडयांना ताब्यात घेतलंय. ते पुढील तपास करत आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.