गडचिरोली जिल्हा अनेक दशकांपासून नक्षलवाद्यांचे केंद्र राहिलेले. विकासाच्या योजना नक्षलवाद्यांनी इथपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. गृहमंत्री म्हणून नक्षलवाद्यांना कठोर भाषेत उत्तर देतानाच येथील जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, गेल्या १६ महिन्यांत सातवेळा या जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला. सरकार पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला.
गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी विकासाच्या विविध योजनांना या जिल्ह्यात गती दिली आहे. नक्षलवादाला विकासाचा पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने ते पावले उचलत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकदा आणि उपमुख्यमंत्री म्हणून दोनवेळा त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला. १५ ऑगस्ट २०२३ ला त्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन केले. तेव्हा पिंपळी बुर्गी येथे भेट देणारे ते राज्याच्या इतिहासातील पहिले गृहमंत्री किंवा राजकीय नेते ठरले होते. हा भाग इतका संवेदनशील की तेथे कोणतेही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजवर गेले नव्हते.
दि. १ मे २०२३ महाराष्ट्रदिनी त्यांनी दमरंचा येथे पोलिस ठाण्याचे उद्घाटन केले होते. छत्तीसगड सीमेवर असलेल्या याच ठिकाणी आदल्या दिवशी चकमक झाली होती. हाही अत्यंत संवेदनशील भाग समजला जातो. शनिवारी रात्री त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला.महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली येथे चकमकीत 38 लाखांचे बक्षीस असलेले 3 नक्षलवादी ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C60 दलाने ही कामगिरी केली.उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गडचिराेलीत जाऊन त्यांचे काैतुक केले. या दलातील पाेलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. गडचिराेलीच्या पालक मंत्रीपदाची जबाबदारीही देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे घेतली आहे. एका बाजुला कायद्याच्या धाकाने नक्षलवाद्यांचा बंदाेबस्त करायचा त्याचबराेबर दुसऱ्या बाजुला विकास कामांतून येथील स्थानिक जनतेला मुख्य प्रवाहात आणायचा प्रण त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री असताना फडणवीस हे गडचिराेली जिल्ह्यात मुक्काम करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले हाेते. गडचिरोली औद्योगिक दृष्ट्या पुढे आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना आणल्या आहेत. ते म्हणतात, येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील कॅपिटल ऑफ इंडिया होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीला गडचिरोली जिल्ह्याचे देखील मोठे योगदान असणार आहे. महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. आता उलट म्हणावं लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोलीतून महाराष्ट्राची सुरुवात होते.
