संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
श्री क्षेत्र आळंदी येथील प पू स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारोतीबाबा कुरेकर महाराज, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर, संतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत.त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारत देशाला आपलं कर्तव्य करण्यासाठी उभं राहायचं आहे. आपल्याला एक संघ भारत निर्माण करायचा आहेतेही सृष्टी आणि निसर्गाला सोबत घेऊन आपण तो बनवूच. कुठल्याही अडचणी आल्या तर पळून जाऊ नका गीतेत देखील हेच सांगितलं आहे की कर्तव्य करा श्रद्धा आणि भक्ती आपल्यात आधीपासून आहे आपला देश श्रद्धेचा आहे. आपल्याला पुरुषार्थाची गरज आहे. कुठल्याही अपेक्षाशिवाय आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले, अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामलला विराजमान झाले आहेत. जे जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे, जे झोपले आहेत त्यांना जागे करण्यासाठी संत कायम प्रयत्नरत असतात.ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहचविण्यासाठी घुमंतू बंधू पुरातन काळापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
आज काल असे अनेक कार्यक्रम होत आहेत जी व्हावेत. अशी अनेक वर्षपासून आपल्या सगळ्यांची भावना आणि अपेक्षा होती. भगवतगीतेत देखील सांगितलं आहे की ती गोष्ट ज्या त्या वेळीच होते. आज आपल्या देशात अनेक मोठे कार्य असेच पार पडत आहेत. शिवाजी महाराजांनी देखील सांगितलं होत की हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा… सगळ्या गोष्टी वेळेवर होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील पसायदानातून हेच सांगितलं आहे. महाभारतात अनेक प्रतिभा संपल्या आहेत. अनेक लोक संपले आहेत. ज्ञान नसेल तर अज्ञानाचा अंधकार असतो आणि त्यात विनाश निश्चित आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
