निळवंडेच्या पाण्याबरोबर श्रेयाचीही लढाई

निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यालाही पाणी खळाळू लागले आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस या धरणासाठी भगीरथ ठरले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पाच्या घोषणा करायच्या आणि अर्धवट काम ठेवायचे ही नीती होती. निळवंडे प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या जन्माच्या आधीपासून अर्धवट होता. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावला. मात्र, आता या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी वर्षानुवर्ष प्रकल्प अपूर्ण ठेवणारे कॉग्रेसचे नेते पुढे आले आहेत.

उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. १९९९ मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी धरण व कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती दिली.मात्र, प्रत्यक्षात राजकीय संघर्ष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे प्रकल्पाला गती दिली. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासोबत बैठका घेतल्या. निधीची तरतूद केली आणि प्रकल्प पूर्णत्वास नेला.

अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व सिन्नर या तालुक्यातील 182 गावांना पाणी मिळणार आहे. आदिवासी भाग असलेल्या अकोले तालुक्याला डावा आणि उजवा अशा दोन उच्चस्तरीय पाईप कालव्यांची भेट देऊन देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपुत्रांना न्याय देत प्रकल्प पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस म्हणतात, अनेक अडचणी होत्या. विखे पाटील हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. हे काम करायचं ठरवलं तेव्हा विखे पाटलांशी चर्चा केली. पहिल्या २२ किमीचं काम झालं नाही तर हे काम पुढे जाईल कसं? आवश्यकता पडली तर मला फोर्स लावावं लागेल, असं मी त्यांना म्हणालो. परंतु, त्यांनी सूचना दिली की फोर्स लावायची आवश्यकता नाही. तुम्ही पिचडसाहेबांना विश्वासात घ्या, पिचड साहेब निश्चित यातून मार्ग काढतील. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन पिचड साहेबांना विनंती केली. पहिल्या २२ किमीचं काम होणं गरजेचं आहे. २०१६ सालीच निर्णय घेतला की पाईपने हे काम पूर्ण करायचं. जेणेकरून शेतकऱ्यांना फोर्सने पाणी मिळते.

५० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न जो की सहज मार्गी लावता आला असता. परंतू केवळ राजकारण करण्यात व्यग्र काँग्रेसने तो कायम तेवत ठेवला. उत्तर महाराष्ट्राचा एक मोठा भूभाग पाण्यापासून वंचित आणि तहानलेला ठेवत या काँग्रेसच्या अकार्यक्षम मनोवृत्तीने वर्षानुवर्षे या प्रकल्पाचा खर्च वाढतच गेला आणि राज्याचा तिजोरीवर ताण पडत शेतकऱ्यांना आणि सामान्यांना वेठीस धरण्याचे पाप काँग्रेस ने गेली पाच दशके केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना या प्रकल्पाला पूर्ण करण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी केला. या प्रकल्पाला एक वेगळी उभारी त्यांनी मिळवून दिली त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम बंद पाडले. उपमुख्यमंत्री होताच पुन्हा हा प्रकल्प हाती घेत अवघ्या दीड वर्षात निळवंडे कालवे खळाळून वाहू लागले. या आधी डाव्या कालव्याला पाणी सोडले होते आणि आता उजवा कालवा गावांना पाणी देत वाहतो आहे!