पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जून 2023 मध्ये घेतला होता. आराखड्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या 213 किलोमीटर लांबीच्या अंतिम आखणीस मान्यता देत रस्ते विकास महामंडळावर बांधणीची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे पुणे ते नाशिक अंतर पाच तासांवरून केवळ तीन तासात पार करता येणे शक्य असून, पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
राज्यभरात दळणवळ व्यवस्था बळकट करण्यासाठी रस्ते विकास महामंडळ 4 हजार 217 किलोमीटर महामार्गाचे जाळे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत नाशिक- पुणे औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी वीस हजार कोटी इतका रुपये खर्च असून 180 किलोमीटर महामार्गामुळे नाशिक ते पुणे ते अंतर कमी होणार आहे तसेच औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे हा नवीन औद्योगिक मार्ग पुणे- राजगुरुनगर- चाकण- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- घारगाव -संगमनेर -सिन्नर – नाशिक असा प्रस्तावित आहे.
प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची आखणी रेषा राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर अशा महत्त्वाच्या शहरांजवळून प्रस्तावित आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा भाग पुणे ते शिर्डी साधारण लांबी 135 किलोमीटर, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज (सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाचा भाग) साधारण लांबी 60 किलोमीटर व सुरत-चेन्नई द्रुतगती महामार्ग ते नाशिक (नाशिक-निफाड राज्यमहार्गाचा भाग) साधारण लांबी 18 किलोमीटर असे एकूण 213 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल.
