इराणकडून भारताला व्हिसामुक्त प्रवेश

इराणमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इराण सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्यात आली आहे. इराण सरकारने ४ फेब्रुवारी २०२४ पासून भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची अट रद्द करण्यास मान्यता दिली आहे. इराण सरकारच्या या निर्णयामुळे इराणमध्ये भारतीय पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये काही अटींचाही समावेश आहे. सामान्य पासपोर्ट असलेल्या लोकांना आता व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल, परंतु काही निर्बंध कायम राहणार आहेत.

भारतीय प्रवासी केवळ पासपोर्टच्या आधारे इराणमध्ये प्रवेश करू शकतील. ते इराममध्ये १५ दिवसांपर्यंत व्हिसा शिवाय राहू शकतील.अशाप्रकारे ६ महिन्यात एकदा ते व्हिसाशिवाय इराणमध्ये जाऊ शकणार आहेत. या मुक्कामाची कालमर्यादा वाढवण्यासाठी किंवा ६ महिन्याच्या आत पुन्हा इराणमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना नियमित व्हिसा मिळवणे अनिवार्य असणार आहे.

व्हिसा कालबाह्यता केवळ इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या प्रदेशात पर्यटनाच्या उद्देशाने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना लागू होते.जर भारतीय नागरिकांना दीर्घ कालावधीसाठी इराणमध्ये राहायचे असेल किंवा सहा महिन्यांच्या कालावधीत एकपेक्षा जास्तवेळा प्रवास करायचा असेल, तर इतर प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता असेल. अशा लोकांनी भारतातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या संबंधित प्रतिनिधींद्वारे आवश्यक व्हिसा मिळवावा. या सूचनेमध्ये नमूद केलेला व्हिसा केवळ हवाई सीमेद्वारे देशात प्रवेश करणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होतो.

मलेशिया, श्रीलंका आणि व्हिएतनामनेही अलीकडेच भारतीय नागरिकांसाठी व्हिसाची आवश्यकता शिथिल केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये थायलंडनेही व्हिसामुक्त प्रवासाला परवानगी दिली होती. थायलंडची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असल्याने त्यांनी भारतीय नागरिकांसाठी १० मे २०२४ पर्यंत व्हिसा सूट जाहीर केलीय. ऑक्टोबर २०२३ मध्ये श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अली साबरी यांनी भारत, चीन आणि रशियासह सात देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा आवश्यकता काढून टाकल्याची घोषणा केली होती, ज्यात ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.