उबाठा गटाच्या अंतर्गत वादामुळे गोळीबार; उदय सामंतांचा गंभीर आरोप

उबाठा गटाचे तरूण नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तर विरोधकांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा मागितला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक आरोप केला. घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिसला ठाकरे गटानेच मोठे केले होते, तसेच पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्यात बैठक ठरली होती, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले हा सर्व प्रकार उबाठा मधीलअंतर्गत वादामुळे झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दोन्ही व्यक्तींना मोठे करण्यामागे सामना आणि मातोश्री असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी सामना वृत्तपत्रातील कात्रणे, ट्विट आणि बॅनर पुरावे म्हणून दिले.अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिसचे उदात्तीकरण सामना वृत्तपत्रातून झाले. ‘सामना’मध्ये आलेल्या एका बातमीत म्हटले की, कफ परेड ते शिर्डी ११५ दिवसांचा मदत यज्ञ, अशा अनेक बातम्या मॉरिसच्या सामन्यातून आल्या आहेत. तसेच मॉरिस याने अनेक वेळा ट्विट करुन आपले नेते कोण आहेत, आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, हे सांगितले आहे. फेसबूक लाईव्हमध्ये त्यांनी आपणास उबाठा शिवसेना मोठी करायची आहे. महिलांसाठी एकत्र काम करायचे आहे. असे म्हटले होते.

आजपर्यंत ‘सामना’ या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. ‘सामना’तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला ‘सामना’तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले.

उदय सामंत पुढे म्हणाले की, घोसाळकर कुटुंबाच्या घरात जी घटना घडली, ती चुकीचीच आहे. त्याचे कुणीही समर्थन करत नाही. मात्र घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना त्यात ओढण्याचा प्रयत्न होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे.आताचे मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात. त्यांना अनेक लोक भेटतात. आधी तसे नव्हते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.