महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट कायम असून, शुक्रवारी (ता. ९) राजस्थानातील सिकार यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार झारखंडमध्ये किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे.

देशांत आजपासून येत्या १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. याशिवाय, महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो. १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला, तेलंगणामध्ये १० आणि ११ फेब्रुवारीला आणि केरळमध्ये १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे शेती, फळबागांवरसुद्धा त्याचा परिणाम हात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. खोकला, सर्दी यासारखे आजारदेखील बळावले आहेत.