लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (10 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ( सीएए ) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी देशात सीएए कायदा लागू करणार असल्याची मोठी घोषणा अमित शहांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असं वक्तव्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या भेटीदरम्यान अमित शहांनी केलं होतं.

एएनआयने या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह म्हणाले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा ( सीएए ) कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. या कायद्याचा उद्देश केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणं आहे.

एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्याचेही अमित शाह म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. 2019 साली नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर झाला होता. त्यानंतर दिल्लीच्या शाहीन बागेत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु झालं होतं. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह यांनी ही मोठी घोषणा केली.

मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते. सीएएबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. सीएए फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे, असे अमित शाह यांनी म्हटलं.

अमित शाह पुढे म्हणाले की, शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकदा देण्याचे वचन काँग्रेसने दिले होते. ते म्हणाले की, जेव्हा देशाचे विभाजन झाले होते तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांचा छळ केला जात होता. त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते, तेव्हा काँग्रेसने तु्म्ही या, तुम्हाला नागरिकता दिली जाईल असे सांगितले होते.आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना शाह म्हणाले की, ही निवडणूक विकास विरूद्ध भ्रष्टाचार अशी आहे. ते म्हणाले की, ही निवडणुक इंडिया विरुद्ध एनडीओ अशी नाहीये तर भ्रष्टाचार विरुद्ध झिरो टॉलरंन्स अशी आहे.