माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज (१३ फेब्रुवारी) भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करत आहे. मी आजपासूनच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी काही महत्त्वाची विधान केलीत. “सर्वात आधी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, बावनकुळे, शेलार यांचे आभार मानतो. आम्ही विरोधात असतानाही राजकारणाच्या पलिकडेही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे” असं अशोक चव्हाण म्हणाले. आयुष्याची खरी सुरुवात करत आहे. 30 वर्षाच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे. मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करत आहे. वाटचाल करणार आहे. देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे, यासाठी मी आलो आहे. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना विकासाचा दृष्टीकोण ठेवून मी काम करत आहे असं अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले, पक्षाने मला खूप काही दिले आहे. हे पण तेवढच खरे आहे की मी पक्षासाठी भरपूर काम केले आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पक्ष वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे पक्षाने मला भरपूर दिले तरी पक्ष सोडला अशी टीका करणे योग्य नाही .पक्षाला कशी ताकत मिळेल यासाठी प्रयत्न करेल. कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाणांच्या प्राथमिक सदस्य पत्रावर बावनकुळे यांनी सही करत भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातील एक मोठे नेतृत्व आज आमच्यासोबत आलं आहे. अनेक वर्षे महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा गाजवली. अनेक मंत्रीपद भूषवले आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहता आली. ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, असं फडणवीस म्हणाले.