राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली. यावेळी अशोक चव्हाण यांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत बसत होते. मात्र, आता चव्हाण भाजपमध्ये गेल्यावर जनता तुमच्यावर थुंकत आहे, असे वक्तव्य केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर चालण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, यूपीएच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा हा आदर्श घोटाळा होता. त्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण हे होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जनता तुमच्यावर थुंकत आहे. शहीदांच्या विधवाही तुम्हाला शाप देत असतील.
राऊत यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उडविली जात आहे. अशोक चव्हाण हे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा राऊतांना चालत होते. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये चव्हाण सार्वजिनक बांधकाम मंत्री होते. महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीला चव्हाणांसोबत राऊत आणि ठाकरे मांडीला मांडी लावून बसायचे. ते तुम्हाला चालत होते. आता भाजपमध्ये गेल्यावर चव्हाण आदर्श घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. शहीदांच्या विधवा तुम्हाला शाप देत असतील, असे राऊत म्हणतात. साडेतीन वर्षांपेक्षा जास्त काळ चव्हाण यांच्यासोबत राहत असताना तुम्हाला शाप दिले नाहीत का? असा सवाल केला जात आहे.
चव्हाण दोन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांनी पक्षत्यागाची तयारी केली होती असे वक्तव्य गौप्यस्फोटाच्या थाटात राऊत यांनी केले. मात्र, जर तुम्हाला माहित होते तर महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी त्यांच्यासोबत चर्चा का करत होता? असेही राऊतांना विचारले जात आहे. विरोधकांवर टीका करताना बेभान होण्याची राऊत यांची सवय आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावर कालपासून ते टीका करत आहेत. मात्र, त्यामुळे आपण आणि आपला पक्षही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहतोय याची त्यांना जाणीव नाही का? असा सवाल अनेकांनी केला आहे.
