कारसेवक ते खासदार…असा आहे डॉ. अजित गोपछडे यांचा प्रवास

एमबीबीएसची पदवी असलेला एक 22 वर्षांचा तरुण. देशात राम मंदिरासाठी सुरू असलेल्या आंदोलन सुरू होते. अयोध्येत गेलेल्या कारसेवकांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून हा डॉक्टर त्यांच्यासोबत गेला. पण त्याच्याही मनात बाबरीचा संताप होता. रामलल्लांना हक्काचा निवास मिळत नाही यासाठीचा संताप होता. त्यामुळे कारसेवेच्या वेळी बाबरीच्या घुमटावर अजित गोपछडेही चढले. कारसेवेत सहभागी झाले.

डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. त्यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

भाजपच्या डॉक्टर सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे. पण नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की, त्यांचे नाव मागे गेल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करुन दाखवायचे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ असलेल्या डॉ. गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरु केली. रामदेवबाबांच्या संपर्कात राहून अनेक विविध उपक्रम राबवले. दि. 8 मे, 2020 रोजीच्या महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक लागली होती. भाजपतर्फे दिल्लीहून निश्चित होऊन येणार्‍या चार उमेदवारांमध्ये भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अजित गोपछडे यांचे नाव दिल्लीहून निश्चित झाले. पक्षाच्यावतीने त्यांनी अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत भरला. अर्जाची छाननी झाली व पडताळणी झाल्यावर अर्ज वैध ठरला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील वैद्यकीय क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये, स्वयंसेवकांमध्ये एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पुढील दोन-तीन दिवसांत राजकीय घडामोडी घडल्या आणि शपथविधीला काही तास बाकी असताना डॉ. अजित गोपछडे यांना पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितले.

हा पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून डॉक्टरांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता व पक्षहित डोळ्यांसमोर ठेवून अर्ज मागे घेतला. कोरोना या जागतिक महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी असल्याने त्यांनी दुसर्‍याच क्षणी मुंबईतील धारावी व उपनगरातील जनकल्याण समिती, रा. स्व. संघ व भाजप वैद्यकीय आघाडीचे सेवाकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अजित गोपछडे यांना खासदारकी मिळणे आता निश्चित झाले आहे.