हायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीं आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलीय. उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपनं अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडेंचं नाव जाहीर केल्यानं नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होतंय. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याचीच प्रतीक्षा आहे.
मिलिंद देवरा यांनी एक महिन्यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली होती. त्यामुळे आता महिन्याभरातच देवरा यांना शिवसेनेत प्रवेश केल्याचे बक्षिस मिळाले का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर मिलिंद देवरा हे काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेतून उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. परंतु आता त्यांना राज्यसभेच्या रिंगणात शिवसेनेच्याबाजूने उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिलिंद देवरा यांचा 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत जन्म झाला. मिलिंद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. मिलिंद देवरा हे उच्चशिक्षित असून त्यांनी अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठातन पदवीचं शिक्षण घेतलं. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत 2004 आणि 2009 असे सलग दोन वेळा विजयी झाले होते. 2014 मध्ये मोदीलाटेत आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) अरविंद सावंत यांच्याकडून मिलिंद देवरा यांना पराभव पत्कारावा लागला. ते पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत होते.
