वर्षानुवर्षे अभेद्य असलेली काँग्रेसची लातूरची गढी आणि भोरचा बालेकिल्लाही उध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाने आज बोलावलेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे गैरहजर राहिले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचे आमदार फुटीच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे तीन मोठे चेहेरे महायुतीत सत्तेत सामील झाल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. दोन दिवस काँग्रेस आमदारांचे लोणावळ्याला शिबिर आयोजित केले आहे, पण आज बोलावलेल्या बैठकीला काही आमदार अनुपस्थितीत राहिले आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण सत्तेत सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अन्य आमदारही सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे 36 आमदार उपस्थित होते, तर 7 आमदार अनुपस्थित राहिले आहेत.
यामध्ये अमित देशमुख, संग्राम थोपटे, मोहनराव हंबर्डे, माधवराव जवळगेकर, जितेश अंतापूरकर, के. सी. पाडवी, सुलभा खोडके यांचा समावेश आहे. लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. विलासराव देशमुख यांनी वर्षानुवर्षे लातूरचे नेतृत्व केले. त्यांचे चिरंजीव अमित देशमुख तीन वेळा आमदार आहेत. मात्र, देशमुखही बैठकीला गैरहजर राहिल्याने आता लातूरची गढीही काँग्रेससोबत राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोरमध्ये माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आमदार संग्राम थोपटेही गेल्या तीन टर्मपासून आमदार आहेत. थोपटे हे कट्टर पवारविरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र, आघाडीच्या अपरिहार्यतमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घ्यावे लागले होते. मात्र, अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागाच्या निमित्ताने थोपटेही काँग्रेस सोडू शकतात, असे म्हटले जात आहे. थोपटे यांनी काँग्रेस सोडल्यास त्याचा सर्वाधिक फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येण्यासाठी थोपटे यांची मदत सुळे यांना गरजेची आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थोपटेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. थोपटे यांचे सासरे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटात आहेत. त्यामुळे थोपटे यांच्यासमोर अजित पवार गटाचाही पर्याय खुला आहे.
दरम्यान, लोणावळ्यातील शिबिरात सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच, आमदारांचं नेमकं म्हणणं, त्यांची अपेक्षा, काँग्रेसची पुढील भूमिका शिबिरात स्पष्ट केली जाणार आहे. राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना निवडून आणण्यासाठी आमदारांना सांगितलं जाणार आहे.
