पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात झाल्या तर विरोध करण्याच्या मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यावर नारायण राणे यांनी खडसावले आहे. डोक्यावर परिणाम झालाय का्य? औकात ओळखा असे राणे यांनी सुनावले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस होता. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. नुसती नाटके सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का? काय नुसते चालले आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांना जागेवरुन हलवून दाखव, असं प्रतिआव्हानच नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. “मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
