एका बाजुला कॉग्रेसचे खासदार राहूल गांधी इलेक्ट्रोरल बाँडच्या विरोधात असताना हे बाँड रद्द केल्याचा मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. आमच्याकडे आता वीजबील भरण्यासाठीही पैसे नाहीत”, अशी उद्विग्न व्यथा कॉग्रेसचे राष्ट्रीय खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना माकन यांनी आत्ता आमच्याकडे खर्चासाठी पैसेच नाहीत. वीजबीलच काय, कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीयेत. फक्त भारत न्याय यात्राच नाही, काँग्रेस पक्षाच्या सर्व राजकीय प्रक्रियांवर परिणाम झाला आहे. आम्हाला पक्षनिधी स्वरूपात लोकांकडून पैसे येत होते आणि त्यातून आम्ही खर्च भागवत होतो. पण आता लोकांना प्रश्न पडेल की आम्ही दिलेला पैसा पक्षाला पोहोचतच नाहीये, मग आपण पैसे द्यावेत की नाही?
ही फक्त काँग्रेस पक्षाची खाती गोठवली नाहीयेत, तर आपल्या देशात लोकशाही गोठली आहे”, अशी टीका करत अजय माकन म्हणाले, लोकसभा निवडणुका जाहीर व्हायला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवून हे सरकार काय सिद्ध करू इच्छित आहे? कोणत्या आधारावर ही खाती गोठवली जात आहेत हे जर मी तुम्हाला सांगितलं तर ते हास्यास्पद वाटेल. काल संध्याकाळी युवक काँग्रेसची खातीही गोठवली आहे. त्यातून २१० कोटींची एकूण रिकव्हरी प्राप्तिकर खात्याने मागितली आहे. हे कुठल्या बलाढ्य उद्योगपती किंवा कॉर्पोरेट टॅक्सचे पैसे नाहीयेत. हे पैसे आम्ही ऑनलाईन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत. या पैशातल्या ९५ टक्क्यांहून जास्त पैसा १०० रुपयांपेक्षाही कमी स्वरुपात यूपीआयच्या माध्यमातून लोकांनी जमा केला आहे. युथ काँग्रेसच्या सदस्यत्वासाठीच्या शुल्क स्वरुपात गोळा झालेला पैसा युवक काँग्रेसच्या खात्यांमध्ये आहे. तो पैसा प्राप्तिकर विभागानं गोठवला आहे. हे वेदनादायी आहे.
