जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’; जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रूपये

समाज कल्याण विभागाकडून 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजने’चा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी 3 हजार रूपये थेट लाभ वितरण (डीबीटी) प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येईल.

दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत असणाऱ्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनोसपचार केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. पात्र व्यक्तींना तीन हजार रुपये लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र, मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी सध्यास्थितीत 65 वर्ष व त्यावरील अंदाजीत एकूण 10-12 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखाली दिव्यांग दुर्बल ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी वयोश्री योजना सुरू केली आहे.