राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आलीय. हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झालीय. राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना तिकिट मिळेल असंही म्हटलं जात होतं. पण त्यांना तिकिट नाकारल्यानंतर आता मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलीय. राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसली तरी हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचे वर्चस्व मिळाले आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता आहे. या निवडीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. तसेच, ते आज अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या निवडीमुळे हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा आले आहेत.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीमुळं राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद महाराष्ट्राकडे आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रीय सहकार संघाच्या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात आहे. राष्ट्रीय सहकार साखर संघात गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच भाजपला वर्चस्व मिळवता आले. हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. नीरा भीमा सहकारी साखर कारखानाही त्यांच्याकडेच आहे. 2019 पासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये सक्रीय असून त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवले जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली नाही. त्यांची साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
