मने दुखावलीत, उद्धव ठाकरेंबरोबर युती कधीही नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

खालच्या स्तरावर बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे यांनी मने दुखावली आहेत. त्यांच्याबरोबर युती कधीही शक्य नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर्स या कार्यक्रमात झालेल्या दिलखुलास मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुमची मैत्री घट्ट झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशीही आपली जुनी मैत्री आहे. ते पुन्हा तुमच्यासोबत येतील का?” असा प्रश्न विजय दर्डा यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली. एखाद्या गोष्टीवर तुमचे मतभेद असतील तर ते मतभेद दूर करून एकत्र येता येतं. पण इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. इथे आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते बोलतात, त्यामुळे मनं दुखावतात. जिथे मनं दुखावतात तिथं युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून एकत्र येता येतं. पण जिथं मनं दुखावली असतील तिथं एकत्र येणं कठीण असतं आणि आमचं मनं दुखावली आहेत, हे मात्र नक्की आहे.

मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले, शेवटी कार्यकर्त्यांचे मोटीवेश काय असते, तर माझा नेता मोठा झाला पाहीजे हे मोटीवेशन असते. जेव्हा आमचे नेते म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहीजे, तेव्हा आमच्या लोकांना आनंद वाटतो. तसेच एकनाथराव शिंदे यांचे शिवसेनेचे लोक आहेत. त्यांच्या जवळ जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमंत्री करायचे आहे, तर टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील ना. तो उत्साह येणार नाही. शेवटी त्यांच्या पक्षाच्या लोकांनाही हेच वाटतं, की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री कायला हवे आणि अजितदादांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटतं की, दादांना करायला हवे. पण अल्टिमेटली आम्ही तिघेही याचा निर्णय करू आणि यात मोठा रोल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल.