मराठा आंदोलक आक्रमक, नांदेडमध्ये काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीवर दगडफेक

मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा अपेक्षित असताना नांदेड जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका गावात कीर्तनाच्या कार्यक्रमाला आलेल्या नांदेड दक्षिणच्या काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. नांदेड शहरालगत असलेल्या पुंड पिंपळगाव येथे ही घटना घडली.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होती.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित आहेत.

आरक्षणासाठी मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. मी घरचा माणूस आहे, तरीही रागातून माझी गाडी फोडली. यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार मोहन हंबर्डे यांनी व्यक्त केली आहे.गाडी फोडल्याचा मला राग होता. पण त्यांची मागणी रास्त आणि न्यायिक असल्याने मी पोलिसात तक्रार केली नाही. मराठा समाज आता घरच्या माणसाला देखील सोडत नाही. माझी गाडी फोडली यावरून सरकारने समजून घ्यायला पाहिजे असे मोहन हंबर्डे म्हणाले.