काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात; राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा

भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात थोरातांवर निशाणा साधला. शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना विखे बोलत होते.

शिवजयंतीनिमित्त मंत्री विखे यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वरील दावा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली आहे. आमची सर्वांची तीच भूमिका आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मराठा समाज मागासलेला असल्याचे सॅम्पल सर्व्हेत सिद्ध होत आहे. उद्या (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव आम्ही आणतोय. सर्व राजकीय पक्ष पाठिंबा देतील आणि ठराव एकमताने मंजूर होईल, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या निर्यातीशुल्काच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. याबाबत विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषीमंत्री होते. शेती मालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावे. सूचना करणे सोपे आहे. मात्र जेव्हा सत्तेत असताना संधी होती त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू असून आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे.