राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मुंबई हायकोर्टात आता शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट लढत सुरू झाली आहे. अजित पवार गटाने आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आता मुंबई हायकोर्टाने शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे आणि 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने केलेल्या खेळीमुळे शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे. या याचिकेवरील सुनावणी 14 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळतः अजित पवार यांच्याकडेच असेल, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. अजित पवारांकडे विधीमंडळातील संख्याबळ असल्याने त्यांच्याकडेच पक्षाची कमान आहे, असे त्यांनी निकालात सांगितले होते. तसेच अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटातील आमदारांना अपात्र न ठरवण्याचा निर्णय घेतला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाच्या आमदारांना या प्रकरणी उच्च न्यायालयाने नोटीस जारी केलीय. अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे. न्यायमूर्ती गिरिश कुलकर्णी यांच्या कोर्टात सुनावणी झाली.
राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. नार्वेकरांनी आपल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या निकालाला याचिकेतून आव्हान देण्यात आलंय.
