‘मनोज जरांगे हा शरद पवार यांचा माणूस’ बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनात फूट पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप होऊ लागले आहे. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि किर्तनकार असलेले अजय महाराज बरासकर यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्याच्या काही तासानंतर मराठा आंदोलनातील मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना समोरे जावे लागत आहे.

संगीता वानखेडे म्हणाल्या मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हतं. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. १ ते १.५ महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय.

मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते.

मागणी काय होती मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची, आता आरक्षण मिळालं, मग दुसऱ्याच्या ताटातलं का घेताय? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काहीतरी करायचं, कारण शरद पवार यांचा पक्ष संपला आहे, आणि शरद पवार यांनी हा माणूस उभा केला आहे. कारण हा सगळ्यांना शिव्या घालतो, पण शरद पवार यांना कधीच चुकीचं बोलत नाही असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं, दंगल घडली की घडवली याचा सरकाराने शोध लावावा, आंतरवालीत पोलिसांकडून लाठीमार झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला. तेव्हापासून मी जरांगे यांच्यासोबत काम करतेय. असंही संगीता वानखेडे यांनी म्हटलंय.