सिमी प्रकरणात भुसावळातून शिक्षकाला अटक ; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

सिमी (स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेच्या निघणाऱ्या मासिक इस्लामिक मुव्हमेंट मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ याला भुसावळ येथील खडका रोड येथून दिल्ली स्पेशल सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.त्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये घेऊन दिल्ली येथे पोलीस रवाना झाली आहेत.

हनीफ शेख मोहम्मद हनीफ याने 2001 मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे मासिक ‘इस्लामिक मुव्हमेंट’मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संशयित सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने संशयिताला 2002 मध्ये फरार घोषित केले हाेते. संशयित भुसावळात असल्याची गाेपनीय माहिती दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल गुरुवारी दुपारी भुसावळमध्ये धडक दिली. पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणावरून हानिफ शेख मोहम्मद हानिफ पत्ता शोधून काढला होता. त्यांनतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मिल्लत नगरमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी हानिफला दिल्लीत नेण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश व्हीं सी बर्डे यांच्या खंडपीठासमोर ट्रान्झिट रिमांड मागितला होता. न्यायालयाने प्रकरणाची माहिती करुन घेतल्यानंतर दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांना 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.

दरम्यान, स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेच्या इस्लामिक मुव्हमेंट या मासिकामध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल आरोपी हानीफ विरुद्ध दिल्लीत 23 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी शेख सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने 2002 मध्ये त्याला फरार घोषित केले होते. त्यानंतर संशयित आरोपी हा भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली स्पेशल सेलला मिळाली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी दिल्ली स्पेशल सेलचे 15 अधिकारी आणि कर्मचारी भुसावळमध्ये दाखल झाले.