मराठवाडा, विदर्भावर पुन्हा अवकाळीचे ढग

विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे ढग दाटण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस विदर्भात तुरळक ते हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 24 फेब्रुवारीला पूर्व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तर 25 आणि 26 फेब्रुवारीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

24 फेब्रुवारीला आणखी एक पश्चिम विक्षोप सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, एक कमी दाबाची रेषा मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय आहे. या हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून मराठवाड्यात रविवार, 25 फेब्रुवारी ते मंगळवार, 27 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा काहीसा जोर राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून पुढील पाच दिवस हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. या भागात सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडण्याची शक्यता आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी (ता. 22) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट तर किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.