तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे अशी टीका करीत बारामतीतील महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे केले. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आज शेतकरी, कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस महायुतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुतारी चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादीतुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे. पण त्यांना चिन्ह मिळाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र ही निवडणूक मोदी गॅरेंटीवर होणार आहे.
लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवेल. जागा ठरल्यानंतर त्या निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील. बारामतीमध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल आणि त्या उमेदवाराला ६० टक्के पेक्षा जास्त मते मिळतील. बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या नेतृत्वाला 150 देशांनी जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व असल्याचे मान्य केले. ते जगातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत, आपल्याला मोदींनी वाचवण्याची काम केले. जगातील 103 देशांना कोविड लस देऊन वाचवण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. राहुल गांधी भारत जोडो व न्याय यात्रा काढत आहेत,पण भारताला तोडण्याचे काम काँग्रेस पार्टीने केले होते. यंदा 182 कोटी लोक काश्मीरला जाऊन आले आहेत. कारण कलम 370 हटवले, भयमुक्त काश्मिर बनलं.
ठाकरे सरकारने गरीब मराठा समाजाचा विचार केला नाही. मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी आरक्षण दिले. मराठा समाजाल दिलेले 10 टक्के आरक्षण टिकणारे आरक्षण आहे. मराठा समाजाचे 10 टक्के आरक्षण कोणीचं काढू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
