शरद पवार कलियुगातील शकुनी मामा आहेत; सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

इस्लामपूरमध्ये महायुतीतर्फे रयत क्रांती संघटना पुरस्कृत शेतकरी कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बहुजनांचा होईल. मलादेखील खासदार व्हायचं होतं. त्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मी रान तयार केलं. त्याची पेरणीदेखील केली. परंतु, ही जागा शिवसेनेकडे देण्यात आली. वळवाचा पाऊस पडल्यासारखं धैर्यशील माने आले आणि ते खासदार झाले. मलादेखील खासदार व्हायचं आहे. त्यामुळे धैर्यशील माने तुम्ही आता थांबता का बघा. आपल्या दोघांत आता पैरा फेडण्याची वेळ आली आहे. मला तिकीट मिळालं, तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तुम्हाला तिकीट मिळालं तर मी तुमच्या पाठीशी राहतो,असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी जाहीर मेळाव्यातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे हातकणंगलेमधून उमेदवारी मागितली. गत लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होते. मात्र ऐनवेळी हा मतदार संघ शिवसेनेच्या वाटेला गेला, असं स्पष्ट करत यावेळी लोकसभा निवडणुक लढवण्याची स्पष्ट भूमिका खोत यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत, अशी टीका करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला,महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरु आहे, त्यामागं शरद पवार असल्याचे सांगत, तुतारी दोन वेळा वाजती, एकदा लक्ष्मीच्या पाऊलांनी नवरी यायला लागते तेंव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पाऊल चालायला लागली की तुतारी वाजते. यामुळे ही शेवटची घटका असून आता तुम्हाला तुतारी वाजवत जायचे आहे. कारण हे पाप तुमचे आहे.अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना मिळालेल्या पक्ष चिन्हावरुन जहरी टीका केली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा महायुतीचा उमेदवार निवडून येणार. सदाभाऊ खोत यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे राहायचं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता सदाभाऊ खोत यांचाच धूम धडाका होणार आहे. सदाभाऊ खोत यांच्या पाठीशी भाजप ठामपणे आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुती रयत क्रांती संघटना पुरस्कृत कामगार परिषदेमध्ये बोलताना केले.