ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिल्पा बोडखे यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रा. बोडखे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.

शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राजीनामा देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.

विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होत्या. मात्र ठाकरे गटात वारंवार अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना बोडखे यांनी यापुढेही त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे. पण आता मला कळाले की, येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्या उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला देखील जुमानत नाहीत, असा आरोप शिल्पा बोडखेंनी केला होता.

मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे.

जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद.