देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील – नितेश राणे

देवेंद्र फडणवीसमध्ये दम नाही. पोलिसांच्या आडून करतायत सगळं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशणा साधला. त्यांच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप नेतेही संतापले आहेत. त्यांनी जरांगेंना गंभीर इशारा दिला आहे. ‘मनोज जरांगे यांच्या तोंडातून सध्या तुतारी वाजत्ये अस वाटतंय. जरांगे यांनी माफी मागावी’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मनोज जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील , त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती असेही ते म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, शिवबा संघटनेतील जरांगेंच्या जवळील सहकाऱ्यानं सांगितलं की, जरांगे शरद पवार गटाच्या आणि स्थानिक आमदाराच्या जवळील आहेत. त्यांच्याबरोबर जरांगे-पाटलांच्या बैठका होतात. राजकारण सोडून जरांगे-पाटलांनी भूमिका घेतली, तर आम्ही मराठा समाजाबरोबर आहोत. पण, ‘सागर’ला येणं फार लांबची गोष्ट आहे. आमची भिंत ‘सागर’बंगल्याच्या बाहेर आहे. ती भिंत पार करणे स्वप्नातील गोष्ट आहे. आमची लढाई मराठा समाजाशी नाही. आम्ही मराठा समाजाचे आहोत. एक व्यक्ती मराठा समाजाची बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही.

संजय राऊत यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, रात्रीची उतरली असेल तर तुम्ही कालपासून कुणाला फोन करताय हे बाहेर येईल. सिल्व्हर ओक, जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांना बोलत असतील याचा सिडीआर कधीतरी बाहेर येईल. जी भाषा पवार, उद्धव ठाकरे बोलतात तीच भाषा जरांगे बोलत आहेत. आम्ही राजकीय आंदोलनाला समर्थन देणार नाही. आम्हाला धमकी देणाऱ्याचे नंबर आमच्याकडे आहेत, आज ना उद्या पोलीस जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

एका माजी मुख्यमंत्र्याला , सध्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्याला उद्देशून शिव्या दिल्या जात आहेत आणि कोणीच काही हरकत घेतली नाही, हे कसं चालतं, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. अनेक मराठा संघटनांनी आंदोलनं केली पण कुणाची भाषा घसरली नाही. मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा असी मागणी नितेश राणेंनी केली.