नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर – इगतपुरी दरम्यानच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा २५ किमी लांबीचा टप्पा सोमवार, ४ मार्च रोजी वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली. सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा टप्पा कार्यान्वित झाल्यास नागपूर – इगतपुरी थेट प्रवास करता येणार आहे.
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला असून, आता सुमारे ६०० किमी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. एमएसआरडीसीकडून भरवीर ते इगतपुरीदरम्यानच्या २३ किलोमीटरच्या मार्गाची कामे पूर्ण झाली असून, आता तो येत्या ४ मार्चपासून सुरू केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअथडळा द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या भरवीर-इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांचा प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार आहे. त्यामुळे इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.
समृध्दी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या सर्वजण प्रतिक्षेत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यान हा महामार्ग तयार होत असून आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
