केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने’ला मंजुरी दिली. यासाठी ७५ हजार २१ कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, छतावर सौर पॅनेल बसवण्याच्या आणि एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी ३०,००० रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी ६० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
सरकारने या योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. ते स्थापित करण्यासाठी, तुम्ही ग्राहक पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. येथे तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक,नाव,पत्ता आणि तुम्हाला किती क्षमतेचा प्लांट उभारायचा आहे, यासारखी माहिती भरावी लागेल. डिस्कॉम कंपन्या या तपशीलांची पडताळणी करतील आणि प्रक्रिया पुढे नेतील. पोर्टलवर अनेक विक्रेते आधीच नोंदणीकृत आहेत, जे सौर पॅनेल बसवतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही विक्रेता निवडू शकता. पॅनेल स्थापित केल्यानंतर, डिस्कॉम नेट मीटरिंग स्थापित करेल, असे ते म्हणाले. रूफटॉप सोलर योजनेसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी आवश्यक असलेली सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी देशात तीन मोठे प्रकल्प उभारले जाणार असून यातून सेमीकंडक्टरच्या निर्मितीमध्ये भारत लवकरच आत्मनिर्भर होणार असल्याचा दावा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. यापैकी एक आसाम व दुसरा गुजरातमधील सानंद येथे उभारण्यात येणार आहे. या तिन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकार एक लाख २६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. देशातील सेमीकंडक्टरची गरज पुरवून देश निर्यात करणार असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केली आहे, असे सांगण्यात आले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
-या योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळेल. यामुळे महिन्याला हजारो रुपयांची बचत होईल.
-सोलर प्रकल्पातून अतिरिक्त वीज विकून पैसा कमावता येईल.
-रहिवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून ३० गिगावॉटवीजही तयार होईल.
-यामुळे कार्बन उत्सर्जनातही पुढील २५ वर्षांत ७२० दशलक्ष टनपर्यंतची घट होईल.
-या योजनेत उत्पादक, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांच्या माध्यमातून १७ लाख रोजगार तयार होईल.
