अमोल कोल्हेंसारखा उमेदवार देणं आमची चूक – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमोक कोल्हे यांना थेट आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार हे शिरुर लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली.

अजित पवार म्हणाले की, अमोल कोल्हेंसारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक होती. कुणी उमेदवार मिळत नाही तेव्हा अभिनेत्यांना उमेदवारी द्यावी लागते. अजित पवारांनी यावेळी बोलतांना महत्त्वाचं विधान केलं. दरम्यान, अमोल कोल्हेंना मी आणि वळसे पाटलांनी निवडून आणलं,लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करत आहेत, ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा.

अजित पवार म्हणाले की आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यादरम्यान अजित पवारांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी मेळाव्यातून गावोगावच्या सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन अशा अनेकांना पक्षप्रवेश दिला जात आहे.

अशोक पवार यांच्यावर टीका

तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल. लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे अजित पवार यांनी अशोक पवार यांचे नाव न घेता सांगितले. कारखाने चालू करायला सहकार खात्याची परवानगी लागते तिथे आपले दिलीप वळसे पाटील आहेत. अर्थ खात्याकडून परवानगी घेवू तिथं मी असणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला मदत करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.