आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. बारामतीमध्ये महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.अशात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत स्पष्ट सूतोवाच केलं आहे. बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार असा महायुतीला विश्वास आहे, असं म्हणत बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याचं त्यांनी चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत यंदा सुनेत्रा पवार याच बाजी मारणार आहेत, महायुतीला याबाबत विश्वास असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे एकप्रकारे महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी लोणावळ्यात “रन फॉर नेशन, रन फॉर मोदी” मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच सामना होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीकडून याबाबत अधिकृत कोणतेही घोषणा झाली नाहीत. पण तरीही दोनही गटाकडून वेगवेगळ्या सोशल मीडियावर स्टेट्सवरून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून आपली तुतारी निशाणी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्टेट्स ठेवण्यात येत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. कारण राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात हा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याने राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात याची चर्चा होत आहे.
