विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई- मेल हॅक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या इमेल आयडीवरून महाराष्ट्राच्या राज्यपालांना ईमेलही पाठवण्यात आला आहे. राज्यपालांना पाठवलेल्या या ई- मेलमध्ये “काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,” असा मजकूर लिहला असल्याचे सांगण्यात येत आहे. नार्वेकर यांना राज्यपाल कार्यालयाने विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही ईमेल पाठवला नसल्याचे सांगितले, त्यानंतर हा प्रकार समोर आला.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या बनावट सह्या घेतल्याची घटना समोर आली होती. अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री शिंदेंच्या बनावट सह्यांची सुमारे बारा निवेदनं समोर आली होती. मुख्यमंत्री सचिवालयाने यासंदर्भात नरिमन पॉईंट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
फोन हॅक होऊ नये म्हणून काय कराल ?
आपला मोबाईल नंबर बँक खाते, मेल, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे. हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपल्याबाबतीत असा प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी चुका टाळा आणि निवडक सोपे उपाय करा. यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल.
मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा. ई-मेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
