महाराष्ट्रातील अनेक भागांत ‘अवकाळी’, अचानक गारठ्यात वाढ

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आजही देशात अनेक भागात पावसाची शक्यता कायम आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मात्र, घट झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा वाढला आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने त्याचाही हवामानावर परिणाम होत असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेनं येत आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील इतर भागांतही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार, अरुणाचल प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही पावसासोबत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड येथे रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक भागांत हिमस्खलनाच्या घटनाही घटल्याने ५०० हून अधिक रस्ते बंद ठेवावे लागले. तसेच पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडच्या काही भागात वादळी वारा तसेच गारपिटीचा तडाखा बसला.पंजाबसह मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. गारपिटीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.