वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. सध्या ते महाविकास आघाडीसोबत आहेत आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू आहे. असं असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. भंडाऱ्यातील अधिकार महासभेत महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेबद्दल जाहीर वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेवरून भांडणे आहेत आणि त्यांच्यातील भांडणं संपल्यानंतर आमच्याशी चर्चा होईल.
सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावरही भाष्य केलं. काँग्रेस शिवसेनेत 10 जागांवरून भांडणं सुरू आहेत. तर, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात 5 जागांवरून भांडणं सुरू आहेत. पण, माध्यमांत वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही, हे मी सांगतो. आमच्यासाठी चर्चा कधी सुरू होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता, त्यांचीच भांडणं सुरू आहेत तर आमच्याशी चर्चा काय करणार? असं म्हणत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.
“आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांचे भांडण संपल्यानंतर आमच्याशी चर्चा चालू होईल. त्यांचीच भांडणं संपलेली नाहीत तर मग आमच्याशी काय चर्चा होणार आहे. १२ ते १६ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यांची भांडणं संपतील आणि ते आमच्यासोबत चर्चेला बसतील अशी अपेक्षा आहे. यांची भांडणं मिटलेली नसताना ते आम्हाला बोलावतात. आम्हीदेखील बैठकीला जातो. त्या बैठकीत आम्ही विचारतो की तुमचं भांडण संपलं का? ते म्हणतात आमचं भांडण संपलेलं नाही. मग आम्ही सांगतो की आम्ही पुढच्या बैठकीला येतो, असं सगळं चालू आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर मविआसोबत युतीमध्ये राहणार की एकटे लढणार याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना मविआच्या बैठकांना जाऊ नका असा आदेश दिल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडी मविआमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न निर्माण केला जातो आहे.
