काँग्रेसमध्ये अनेक “सुपारीबहाद्दर” आहेत – प्रकाश आंबेडकर

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी अद्याप मविआच्या चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत. अजूनही प्रकाश आंबेडकर मविआमध्ये आहेत की नाहीत? याविषयी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रकाश आंबेडकरांच्या आगामी भूमिकेबाबत तर्क-वितर्क लावले जात असताना दुसरीकडे इचलकरंजीमध्ये झालेल्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं. यावेळी काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर असल्याची गंभीर टीका त्यांनी केली.

राज्यात महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने प्रकाश आंबेडकर आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून काँग्रेसमध्ये नवीन, चांगल्या आणि जिंकून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जात नाही पण घराणेशाही पोसत राहत आहेत आणि यामुळे याचा फायदा नरेंद्र मोदी घेतात. आपल्याला लोकशाही आणायची आहे की घराणेशाही असे विचारतात.असं आंबेडकर म्हणाले.

“काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमचा सल्ला आहे. आधी हे सुपारीबहाद्दर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील”, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

रेखा ठाकूर यांनी पत्राद्वारे मविआवरील नाराजी व्यक्त केली होती,राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या बार्गेनिंगमुळं याला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता एक महत्वाची माहिती समोर आली असून त्यानुसार, वंचितला मविआनं केवळ २ जागा दिल्याची चर्चा आहे.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात एका पत्राद्वारे संताप व्यक्त केला असून येत्या ९ मार्चच्या बैठकीत यावर साकारात्मक चर्चा कराल अशी अपेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडं व्यक्त केली आहे. तसेच आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.